स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर : दिनांक २३ ऑगस्ट २०२६, रविवार रोजी लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था, लातूरची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साही व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अशोक गोविंदपुरकर, संचालक, डीसीसी बँक, तसेच विशेष अतिथी म्हणून श्रीमती अर्चना अमोल जाधव-तांबे, उपजिल्हाधिकारी, जुन्नर-आंबेगाव, जि. पुणे उपस्थित होत्या.

यावेळी *संस्थेचे चेअरमन श्री. परमेश्वर जनक ढेकणे,* सचिव श्री. नामदेव रंगनाथराव सारोळे तसेच संचालक मंडळातील उपाध्यक्ष-श्रीमती दीपिका शिवलकर, श्री. गोविंद सरवदे, श्री. माधव केंद्रे, श्री. नवनाथ कल्याणी, रवी कांबळे, खुरम काजी व श्री. आयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सभासदांच्या २५ गुणवंत मुला-मुलींचा गुणगौरव करून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या ३८ ठेवीदारांचा सन्मान करून त्यांनाही भेटवस्तू देण्यात आल्या.

संस्थेचे चेअरमन श्री. परमेश्वर जनक ढेकणे यांनी संस्थेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा मांडताना सभासदांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. वाढत्या ठेवी, सभासद संख्या, कर्ज सुरक्षा योजना, सभासद सुरक्षा योजना, सुलभ कर्ज प्रक्रिया तसेच मोबाईल ॲपद्वारे डिजिटल बँकिंग सुविधा याबाबत त्यांनी माहिती दिली.

विशेष म्हणजे, संस्थेच्या २८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संस्थेने स्वतःची जागा खरेदी केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. तसेच सभासदांना ९% लाभांश वाटप करण्याची घोषणा करण्यात आली.

सभासदांच्या कुटुंबाप्रती असलेली संस्थेची सामाजिक बांधिलकी जपत, मयत सभासद श्री. तुकाराम शिरुरे यांच्या वारसदारांना संस्थेच्या वतीने ₹२ लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात मा. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी पोलीस पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सभासदाभिमुख आणि समाजाभिमुख सामाजिक कार्य करणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार काढले. मागील वर्षी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹१,११,१११/- चा धनादेश देण्यात आल्याचा तसेच संस्थेच्या सुमारे दीड हजार सभासदांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला.

विशेष अतिथी श्रीमती अर्चना अमोल जाधव-तांबे यांनी पोलीस पतसंस्था ही एका कुटुंबाप्रमाणे असून, कुटुंबातील सदस्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणे हे कुटुंबप्रमुखाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

प्रमुख पाहुणे श्री. अशोक गोविंदपुरकर यांनी संस्थेचा कारभार अत्यंत उत्तम, पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे सांगून *चेअरमन श्री. परमेश्वर जनक ढेकणे* व संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर लातूर जिल्हा पोलीस पतसंस्था प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे.

विश्वास सभासदांचा…
प्रगती संस्थेची…
आणि अभिमान प्रत्येक पोलीस कुटुंबाचा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed