नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. : 70281 92140

वरवंड : दौंड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून सध्या शासकीय मालमत्तेची दिवसाढवळ्या लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलावातील पाण्याची पातळी खालावल्याचा गैरफायदा घेत माती चोरांनी धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकरणाकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे.
  

मिळालेल्या माहितीनुसार, माळवाडी येथील परशुराम गिरमे नावाचा इसम गुरुवारपासून तलावाच्या पात्रातून बेकायदेशीरपणे माती चोरून नेत आहे. विशेष म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सलग तीन दिवसांच्या शासकीय सुट्ट्यांचा मुहूर्त साधून हा अवैध उपसा अधिक तीव्र करण्यात आला आहे. “अधिकारी घरी आणि माती चोर तलावावर” अशीच काहीशी परिस्थिती सध्या वरवंडमध्ये पाहायला मिळत आहे. शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीच नेमकी ही चोरी कशी होते? अधिकाऱ्यांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय हे शक्य आहे का? असे अनेक संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत.


  

या माती चोरीची माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुहास साळुंखे आणि राहुल काळे यांना असूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन केवळ ‘पाहणी’चा फार्स केला आणि पाठ फिरवली. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत चोरी सुरू असतानाही ती रोखली का गेली नाही? याचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे माती चोरांशी आर्थिक लागेबंधे तर नाहीत ना? अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
  

“शेतकऱ्यांचे रान नीट करायचे आहे,” अशी भावनिक सबब पुढे करून हे माती चोर स्वतःचे खिसे भरत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाचा ढाल म्हणून वापर करून शासकीय मालमत्तेवर दरोडा टाकणाऱ्या या चोरांना प्रशासनातीलच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे वरदहस्त लाभल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरड्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खडकवासला कालव्यातून पाणी येण्यास अजून १० दिवसांचा अवधी आहे, तोपर्यंत जास्तीत जास्त माती उपसून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा या चोरांचा डाव आहे.
  

ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावाचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या या माती चोरांवर आणि त्यांना मूक संमती देणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासन कधी गुन्हा दाखल करणार? की सुट्ट्या संपून अधिकारी कार्यालयात येईपर्यंत तलाव पूर्ण खरवडून निघण्याची वाट पाहिली जाणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed