गणेश कांबळे ( उपसंपादक )
फुरसुंगी–ऊरूळी देवाची नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली. नगर परिषदेतील एकूण 32 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष अशा 33 जागांसाठी मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. दिवसभराच्या मतदान प्रक्रियेनंतर एकूण 59.71 टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आज सकाळी मतदान सुरू होताच शहर व परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते. सकाळच्या सत्रात मतदानाचा उत्साह दिसून आला. मात्र, दुपारनंतर उष्णतेमुळे आणि कामकाजाच्या वेळे मुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावला.
दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे 25 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात पुन्हा काही प्रमाणात मतदानाचा वेग वाढला.
संपूर्ण दिवसाच्या मतदान प्रक्रियेच्या अखेरीस 59.71 टक्के मतदानाची नोंद झाली असून, विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे. त्यामुळे आजचा दिवस उमेदवारांसाठी अत्यंत निर्णायक ठरला आहे.
मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासन, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडल्यामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
या निवडणुकीची मतमोजणी उद्या, दिनांक 21 रोजी होणार असून, फुरसुंगी–ऊरूळी देवाची नगर परिषदेवर कोणाची सत्ता येणार, याचा फैसला त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.
