नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

केडगाव येथील खडकवासला पाटबंधारे विभागाच्या शाखेमध्ये सध्या पूर्णतः अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शाखाधिकारी दीर्घकाळ कार्यालयात उपस्थित नसल्याचा फायदा घेत हाताखालील कर्मचारी केवळ हजेरी लावून वेळेआधीच गायब होत असल्याचा प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव येथील खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे हे गेल्या सहा–सहा महिन्यांपासून कार्यालयात नियमित हजर नसल्याचे सांगण्यात येते. वरिष्ठ अधिकारीच जागेवर नसल्याने त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी देखील कार्यालयात येऊन केवळ हजेरी लावतात आणि काही वेळातच निघून जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे.

यापूर्वी कार्यालयाच्या चाव्या नियमानुसार चौकीदाराकडे देण्यात आल्या होत्या. मात्र शाखाधिकारी व इतर कर्मचारी दीर्घकाळ गैरहजर असल्याची बाब माध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचल्यानंतर आणि यावर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ही जबाबदारी चौकीदाराकडून काढून दप्तर कारकून सुजाता जाधव यांच्याकडे देण्यात आली.

दरम्यान, दप्तर कारकून सुजाता जाधव या स्वतः दोन-दोन महिने कामावर हजर राहत नसतानाही त्यांचे वेतन नियमितपणे कसे दिले जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच शाखाधिकारी गैरहजर असल्याचा गैरफायदा घेत त्या सकाळी कार्यालयात हजेरी लावून दुपारी वेळेआधीच कुलूप लावून निघून जात असल्याचेही सांगण्यात येते.

यामुळे सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.१५ या वेळेत प्रामाणिकपणे उपस्थित राहून कर्तव्य बजावणाऱ्या चौकीदारासारख्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुपारीच कार्यालय बंद झाल्यामुळे बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदवता येत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचा दिवस अपुरा भरला जातो किंवा प्रत्यक्ष काम करूनही त्यांची सुट्टी टाकली जाते. परिणामी, याचा थेट परिणाम त्यांच्या वेतनावर होत असून कमी पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.

या प्रकारामुळे भरघोस पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी निर्धास्त होत चालले असून, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

एकंदरीत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा कामचुकार व गैरहजर अधिकाऱ्यांवर मेहरबानी न दाखवता त्यांना कार्यालयात नियमित हजर राहून कर्तव्य बजावण्यास भाग पाडावे, तसेच प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी केडगाव परिसरातील नागरिक व कर्मचारी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *