अजित काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
बेवनूर (ता. जत) जि. सांगली दि. ३ जानेवारी
विजेच्या शॉर्टसर्किटमुळे शेतीचे सातत्याने नुकसान होत असतानाही महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. बेवनूर येथील तुकाराम नाईक यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीत आज दुपारी अचानक स्पार्किंग होऊन भीषण आग लागली. या आगीत ठिबक सिंचन संच जळून खाक झाला असून आंबा बागेसह शेतीपिके व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे ही पहिली घटना नाही. याच ठिकाणी मागील वर्षी ४ मे २०२४ रोजीही महावितरणचे काम सुरू असताना स्पार्किंग होऊन डाळिंबाची तीन एकर, ऊस दोन एकर क्षेत्रातील पिके व ठिबक सिंचन संच जळून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्या वेळी ग्रामसेवक, तलाठी, महावितरणचे कर्मचारी व ग्रामपंच यांच्या उपस्थितीत पंचनामा होऊनही आजतागायत एक पैसाही नुकसानभरपाई मिळालेली नाही.
गेल्या तीन वर्षांत वारंवार अशाच घटना घडत असून महावितरणकडे लेखी तक्रारी करूनही दुर्लक्षच होत आहे. आजच्या घटनेत नागरिकांनी व ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मदन नाईक, विजयकुमार नाईक, डॉ. सुधीर नाईक, महादेव देवकर, लक्ष्मण मलमे, राजू सरगर, जयजय तुकाराम नाईक, बसवेश्वर कुंभार, शिवाजी जाधव तसेच वायरमन मारुती शिंदे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
महावितरणच्या निष्क्रिय व बेजबाबदार कारभारामुळे शेतकरी सातत्याने आर्थिक तोट्यात जात असून जीवितहानीचा धोका देखील वाढत आहे.
वारंवार होणारे स्पार्किंग थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात व झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तुकाराम नाईक यांनी दिला आहे.
ही घटना केवळ एका शेतकऱ्याची नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील शेती किती असुरक्षित झाली आहे याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
