नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
मो. नं. – 7028192140
पाटस : दौंड तालुक्यातील बोरीपारधी येथे शासकीय जागेतील खडकवासला पाटबंधारे विभागाचा मुख्य बेबी कालवा प्रवाह बुजवून त्याचे पात्र वळवून त्यावर अनधिकृतपणे व बेकायदेशीर प्लॉटिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. केडगाव पाटबंधारे शाखेच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या सदर अतिक्रमणाबाबत येथील शासकीय अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.
दौंड तालुक्यातील बोरिपार्धी गावामधून खडकवासला नवीन मुठा डावा कालवा वितरिका क्र. २४ कालवा प्रवाह गेला आहे. सदर कालवा एका बांधकाम व्यावसायिकाने मुरूम टाकून पूर्णपणे बुजवून टाकला आहे. तसेच काही पाईप टाकून त्याचे पात्र देखील वळवून घेतले आहे. सदर काम युद्ध पातळीवर करण्यात आले असून याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र मौन बाळगण्यात आल्याचे दिसून येत आहे.
याविषयी केडगाव पाटबंधारे शाखेच्या शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधिताना नोटीस दिली आहे एवढेच उत्तर देत आहेत तर यवतचे उप अभियंता सचिन पवार यांना याबाबत विचारले असता हे प्रकरण माहीतच नसल्याचा आव आणत आहेत.
यासंदर्भात अधिक चौकशी केली असता काहीजण एका बड्या राजकीय नेत्याचेही नाव घेत आहेत. राजरोसपणे चाललेल्या या अनधिकृत प्लॉटिंग संदर्भात सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने यात मोठी आर्थिक तडजोड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पत्रकारांना देखील उडवाउडवीची उत्तरे देऊन व राजकीय पुढाऱ्यांची नावे सांगून गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कोट्यवधीच्या या बेकायदेशीर कामात शासकीय अधिकाऱ्यांचे हात नक्कीच ओले झाले असल्याची शंका येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.




