नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
मो.नं.- 7028192140
केडगाव : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी येथे खडकवासला बेबी कालव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही धनदांडग्यांनी चक्क सरकारी कालवा बुजवून त्यावर अनधिकृत प्लॉटिंगचे काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात असून, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि भूमाफियांचे आर्थिक साटेलोटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिपार्धी परिसरातून जाणाऱ्या खडकवासला बेबी कालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात माती आणि राडारोडा टाकून तो बुजवला जात आहे. या ठिकाणी सिमेंटच्या पाइपलाइन टाकून त्यावर रस्ता किंवा प्लॉटिंग करण्याचा भूमाफियांचा डाव आहे. विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या हे काम सुरू असतानाही संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याकडे डोळेझाक केली आहे.
कालवा ही सार्वजनिक मालमत्ता असून त्यावर कोणतेही बांधकाम किंवा तो बुजवणे हा गंभीर गुन्हा आहे. मात्र, या प्रकरणात पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मौन बाळगल्याने संशय बळावला आहे. या अनधिकृत कामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

जर हा बेबी कालवा अशाच प्रकारे बुजवला गेला, तर भविष्यात सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पाण्याचा प्रवाह खंडित झाल्यामुळे लगतच्या शेतीवर याचे दुष्परिणाम होतील. तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यास परिसरात पाणी साचून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या अतिक्रमणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून सुरू असलेले काम थांबवावे आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, या भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे.
