नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी  )

मो.नं. : 7028192140

पाटस : गेल्या अनेक वर्षांपासून पाटस येथील गाव तलावाला पडलेला अतिक्रमणाचा विळखा आता लवकरच सुटणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’च्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसीलदारांना धारेवर धरले असता, “लवकरच मोजणी करून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावणार आणि बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करणार,” असा स्पष्ट इशारा तहसीलदारांनी दिला आहे.
    पाटसची जीवनवाहिनी असलेल्या गाव तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण झाले आहे. यामुळे तलावाचा मूळ आकार आकसत चालला असून जलसाठ्यावरही परिणाम झाला आहे. या प्रश्नावर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासन सुस्त होते. मात्र, समाधान शिबिराच्या व्यासपीठावर कार्यकर्त्यांनी थेट तहसीलदारांना गाठून “कारवाई कधी होणार?” असा रोकडा सवाल विचारला.
  कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हलली आहे. तहसीलदारांनी यावेळी स्पष्ट केले की, तलावाच्या जागेची आणि आजूबाजूच्या सर्व सर्व्हे नंबरची तातडीने मोजणी केली जाईल, मोजणीत जे दोषी आढळतील, त्यांना कोणतीही सवलत न देता नोटीस बजावली जाईल, ठराविक मुदतीत अतिक्रमण न काढल्यास प्रशासकीय बळाचा वापर करून ही अतिक्रमणे हटवण्यात येतील.


    तहसीलदारांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे आणि कारवाईचे ठोस आश्वासन दिल्यामुळे वर्षानुवर्षे तलावाच्या जमिनीवर डोळा ठेवून बसलेल्या भूमाफियांमध्ये आणि अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, या निर्णयाचे पाटसच्या सामान्य नागरिकांकडून स्वागत होत असून, “आता फक्त आश्वासन नको, तर प्रत्यक्ष बुलडोझर कधी चालणार?” अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.

“तलावाची जागा ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यावर डल्ला मारणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मोजणीचा अहवाल येताच नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.” — अरूण शेलार, तहसीलदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed