नेताजी खराडे   ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य)

मो.नं. : +91 70281 92140

पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता व संभाव्य घोटाळा झाल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मा. ज्योती कदम मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी संभाजी ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष अविनाश मोहिते पाटील यांनी सांगितले की, सदर योजना सन 2014-15 मध्ये मंजूर होऊन सन 2018 पर्यंत पूर्ण झालेली आहे. या योजनेसाठी मा. खासदार निधीतून सुमारे 4 कोटी 99 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून सुमारे 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला.

मात्र, प्रत्यक्षात कोणतेही लक्षणीय अतिरिक्त काम न करता, पाणी साठा किंवा वितरण व्यवस्थेमध्ये कोणतीही सुधारणा न करता मोठ्या प्रमाणावर निधी खर्च दाखविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सुमारे 5 कोटी रुपयांपर्यंत खोटी बिले काढून काही ठेकेदारांना निधी वितरित केल्याची गंभीर बाब समोर आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची शक्यता असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच, या प्रकरणात माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मिळालेल्या माहितीनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी अविनाश अरविंद मोहिते (महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड पुणे), चंद्रशेखरजी घाडगे (जिल्हाध्यक्ष पुणे), निलेश ढगे (सचिव पुणे) हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed