नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो. नं. : 70281 92140
केडगाव, ता. दौंड : केडगाव परिसरात खडकवासला पाटबंधारे विभागाच्या बेबी कालव्याची बेकायदेशीर तोडफोड झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कालवा फोडल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि विद्युत अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालवा निरीक्षक महेश देवकाते आणि हनुमंत थोरात यांनी जेसीबीच्या सहाय्याने कालवा फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, यवत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सचिन पवार यांनी या कामासाठी परवानगी दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
कालवा फोडल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः कालव्यालगत राहणाऱ्या कुटुंबांना याचा मोठा फटका बसत आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, कालव्याच्या अगदी शेजारी महावितरण विभागाची डीपी उभी आहे. साचलेल्या पाण्यामुळे त्या परिसरात करंट उतरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. डीपीमधून वारंवार स्पार्किंग होत असल्याने मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. जवळच शाळा असल्याने लहान मुले याच मार्गाने ये-जा करत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवासी पांडुरंग बाबुराव शिंगाडे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या घराशेजारी जेसीबीने कालवा फोडण्यात आला. डीपीजवळ पाणी साचल्याने करंट उतरत आहे. रोज स्पार्किंग होत आहे. उद्या एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कालवा फोडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, आता अधिकाऱ्यांवरच कालवा फोडल्याचा आरोप होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच तातडीने कालव्याची दुरुस्ती करून परिसरातील धोकादायक परिस्थिती दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
