राजेंद्र उजागरे ( उपसंपादक )
पुणे, दि. ५ जून २०२६: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पुण्यातील एअरपोर्ट रोड परिसरातील खुले कारागृह येथे पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना हरित वारसा देण्यासाठी एक एकर परिसरात विविध प्रजातींच्या तब्बल ११ हजार वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.

रोटरी क्लब ऑफ पुणे आणि महाराष्ट्र पोलीस कारागृह विभाग यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला वृक्षप्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे स्वागत करत त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. केवळ वृक्ष लागवड करून न थांबता त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारणे हीच खरी पर्यावरणसेवा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थित माननीय सुहास वारके (ए.डी.जी., महाराष्ट्र पोलीस) यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि नैसर्गिक संसाधनांवरील ताण लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनाचे कार्य हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजाच्या सक्रिय सहभागातूनच पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच रोटरी क्लबचे प्रांतपाल संतोष मराठे यांनी पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. वृक्ष म्हणजे केवळ हिरवळ नसून जीवनाचा आधार असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. हरित भविष्यासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हीच काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील विविध घटकांना प्रेरणा देणारा ठरला.
“वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा” हा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
