नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. :  70281 92140

पाटस (ता. दौंड) : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पाटस येथे शुक्रवारी दुपारी व्यावसायिक वादातून झालेल्या संघर्षात अज्ञात व्यक्तीने अग्निशस्त्रातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास पाटस गावातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाजवळील गरदडे कॉम्प्लेक्ससमोर असलेल्या श्री. सिमेंट प्रा. लि. कंपनीमध्ये वाहन भरण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद बेटवाडी येथील संतोष बाळकृष्ण कडू आणि पाटस अंबिकानगर येथील सुरज कुऱ्हाडकर यांच्यातील व्यावसायिक मतभेदातून उद्भवल्याचे समोर आले आहे.

वादाची तीव्रता वाढल्यानंतर दोन्ही गटातील अनेक व्यक्ती घटनास्थळी जमा झाल्या. शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत होत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने अग्निशस्त्रातून गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेतले असून गोळीबार करणाऱ्या तसेच इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्यावसायिक वादातून झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने पाटस परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

“व्यावसायिक वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याने पाटस परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *