अजित काळेल  – ( सातारा जि.संपादक )

कोल्हापूर  :  शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रशासकीय व आर्थिक प्रश्नांबाबत शुक्रवार (दि. ५ जून २०२६) रोजी मुख्याध्यापक भवन, कोल्हापूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीस कोल्हापूर विभागाच्या उपसंचालिका प्रभावती कोळेकर, तिन्ही जिल्ह्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, वेतन पथक अधीक्षक यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.

सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने संघाचे सचिव संतोष नाईक यांनी जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामे ठामपणे मांडली. यामध्ये शालार्थ आयडी मंजुरी व दुरुस्ती, संचमान्यता दुरुस्ती, सेमी अनुदानित शाळांचे प्रलंबित प्रस्ताव, वैयक्तिक मान्यता, अनुकंपा नियुक्ती मान्यता, निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव, वेतनेतर अनुदान, सेवानिवृत्त पूर्णवेळ ग्रंथपालांच्या रजा रोखीकरणाची बिले, थकीत वेतन बिले, जुनी पेन्शन योजना, फंडाचे प्रलंबित प्रस्ताव, पेन्शन पेपर मंजुरी, मेडिकल बिले, विनाअनुदानित ते अनुदानित बदली आदेश तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वैयक्तिक मान्यता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.

संतोष नाईक यांनी सांगली जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यानंतर काही प्रकरणांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या असून काही प्रश्नांवर बैठकीतच सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली.
यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी प्रलंबित कामांचा पुढील काही दिवसांत पुन्हा पाठपुरावा केला जाईल, तसेच सांगली जिल्ह्यात स्वतंत्र आढावा बैठक घेऊन प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकांच्या मेडिकल बिलांबाबत शासनाने घेतलेल्या “आबा कार्ड” संदर्भातील निर्णयाचा होता. या निर्णयाबाबत उपस्थित शिक्षक संघटना, मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांनी एकमताने नाराजी व्यक्त करत त्याला विरोध दर्शविला. या निर्णयामुळे शिक्षकांना विविध अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत अनेक प्रतिनिधींनी मांडले.

बैठकीत सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय झांबरे, ज्येष्ठ शिक्षक नेते जे. एस. आप्पा, शिक्षकेतर संघटनेचे मकरंद कुलकर्णी यांच्यासह विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची प्रभावी मांडणी करून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed