नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
केडगाव (ता. दौंड) : पुणे जिल्ह्यातील केडगाव येथे अवैधरित्या गर्भपात केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन करून गर्भपात करण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या.
गुन्ह्यानुसार, दि. ६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील लवंगारे हॉस्पिटल (लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटल) येथे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, डॉ. स्वाती लवंगारे (रा. केडगाव, ता. दौंड) आणि डॉ. तुकाराम यशवंत मोटे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा, १९७१ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी क्रमांक १ असलेल्या डॉ. स्वाती लवंगारे यांनी गर्भपात करण्यासाठी आवश्यक अधिकृत नोंदणी अथवा परवानगी नसतानाही गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा करून संबंधित महिलेचा अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी क्रमांक २ डॉ. तुकाराम मोटे यांनी गर्भपातासाठी वापरण्यात आलेल्या औषधांच्या नोंदीमध्ये स्वतःचे नाव व सही असल्याचे तपासात आढळून आल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने तपास सुरू केला असून, संबंधित कागदपत्रे व औषधांच्या नोंदींची पडताळणी करण्यात येत आहे. गर्भपातासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाले का, तसेच संबंधित डॉक्टरांकडे आवश्यक परवानग्या होत्या का याचा सखोल तपास केला जात आहे.
यवत पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, या प्रकरणातील सर्व तथ्ये तपासाअंती समोर येणार आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करत आहेत, तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस उपनिरीक्षक अजय मोरे यांनी पूर्ण केली.
अवैध गर्भपातासारख्या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नियमांचे पालन, रुग्णांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि आरोग्य व्यवस्थेतील उत्तरदायित्व याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
