नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो. नं. : 70281 92140
पाटस : यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाटस कसबे परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. संतोष तासगावकर साहेब यांना देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, “पाटस कसबे परिसरातील डोंगरेश्वर नगर (तामखडा), भानोबा नगर, अंबिका नगर, पाटस स्टेशन तसेच इतर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टी दारूचे व्यवसाय सुरू असल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “राज्यात नुकत्याच घडलेल्या विषारी हातभट्टी दारू प्रकरणात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाटस परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. संबंधित ठिकाणी तात्काळ धाडी टाकून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या व्यवसायांना संरक्षण देणारे अथवा कर्तव्यात कसूर करणारे कोणी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर विभागीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी.”
अवैध हातभट्टी दारू व्यवसायांमुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने व्यापक मोहीम राबवून अशा सर्व अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाटस परिसरातील ग्रामस्थ, युवक व महिला भगिनींना सोबत घेऊन यवत पोलीस स्टेशनसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवाजी राजे साळुंके, मिथुन चव्हाण, इमरान खान, शंकर पवार, सोनबा देशमुख तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

