नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. : 70281 92140

  पुणे : आज श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने सामाजिक न्यायाचे प्रणेते, लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे शहराचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे भारतातील सामाजिक समता, शिक्षण आणि बहुजन कल्याणाचे महान शिल्पकार होते. त्यांनी आपल्या राज्यकारभारात सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, बहुजन आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, या विचारातून त्यांनी सर्व समाजघटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण अशा अनेक योजना राबवून ज्ञानाचा प्रकाश घराघरात पोहोचवला.

सन १९०२ मध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची ऐतिहासिक अंमलबजावणी करून सामाजिक न्यायाच्या चळवळीला नवी दिशा दिली. अस्पृश्यता, जातीय विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेत समाजात समतेची भावना रुजवली. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना बळ देणारे कार्य शाहू महाराजांनी केले.

आजच्या युवकांनी राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास केवळ वाचू नये, तर त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा कृतीतून पुढे नेला पाहिजे. शिक्षण, सामाजिक समता, बंधुता, संविधानिक मूल्ये आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष हीच शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या आदर्शांचे स्मरण ठेवून समाजहिताचे कार्य करणे, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार करणे आणि समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी झटणे, ही आजच्या युवकांची जबाबदारी आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे विचार आपण जोपासले, आचरणात आणले आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवले, तरच त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, पुणे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, महादेव मातेरे, संजय चव्हाण राजेश अडसूळ, प्रीतम कोंढाळकर,तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed