नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. : 91 70281 92140

पुणे : दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे गुऱ्हाळामध्ये गूळ निर्मिती करताना प्लास्टिक, रबर व इतर घातक पदार्थांचा वापर होत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच गुळामध्ये भेसळ होत असल्याचीही गंभीर माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर केवळ एका गुऱ्हाळापुरती कारवाई न करता दौंड तालुक्यातील सर्व गुऱ्हाळांची संयुक्त व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड पुणे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केली आहे.

अविनाश मोहिते म्हणाले, “गूळ हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापरातील अन्नपदार्थ आहे. नफेखोरीसाठी गूळ तयार करताना प्लास्टिक, रबर किंवा इतर घातक पदार्थांचा वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळता कामा नये. अशा प्रकारांमुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून दौंड तालुक्यातील प्रत्येक गुऱ्हाळाची तपासणी करावी.”


गलांडवाडी येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की करणे, वाहनाची किल्ली हिसकावून घेणे व धमक्या देणे हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला आहे. या प्रकरणातील संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.

तसेच गुऱ्हाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाची, गूळ निर्मिती प्रक्रियेची, FSSAI परवान्यांची, अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींचे पालन होत आहे की नाही, याची सखोल चौकशी करण्यात यावी.

अविनाश मोहिते पुढे म्हणाले, “जर प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आणि दौंड तालुक्यातील सर्व गुऱ्हाळांची निष्पक्ष चौकशी केली नाही, तर संभाजी ब्रिगेड आपल्या आंदोलनाच्या परंपरेप्रमाणे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही.”


“येणाऱ्या काळात आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्नभेसळ करणाऱ्या व्यक्ती व उद्योगांविरोधात संभाजी ब्रिगेड राज्यव्यापी जनआंदोलन उभारेल. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला आम्ही खपवून घेणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

– अविनाश अरविंद मोहिते
महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed