नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
दौंड : लहान मुले आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळमाफियांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे जिल्ह्यात एकाच वेळी मोठी मोहीम उघडली आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड, दौंड आणि शिरूर तालुक्यांत टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल २६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या धडक कारवाईनंतरही यंत्रणेच्या प्रामाणिकतेवर आणि हेतूवर स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत पुणे, अहमदनगर, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यांमधील बड्या धेंडांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, दूधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेच्या अहवालातून भेसळीचे भयानक स्वरूप आणि त्यामागील मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

एकीकडे एफडीएने धडक कारवाईचा डंका पिटला असताना, दुसरीकडे दौंड तालुक्यातील भैरवनाथ दूध संकलन केंद्रावरील संशयास्पद प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
• या केंद्रावर धाड टाकून भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले.
• या केंद्राचा मुख्य सुत्रधार बापूराव झगडे हा चकमा देऊन फरार झाला आहे.

• धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा गुन्हा दाखल होऊनही आणि भेसळ उघडकीस येऊनही हे ‘भैरवनाथ दूध केंद्र’ आजही राजरोसपणे सुरू आहे!
“बाकीच्यांवर कायदेशीर बडगा उगारला जात असताना, या ठराविक केंद्रावर मेहेरबानी का? जप्त झालेल्या दुधानंतरही हे केंद्र सील का केले गेले नाही?” असा थेट आणि संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित केंद्रचालक आणि तपासणी अधिकारी यांच्यात पडद्यामागे मोठी ‘आर्थिक’ देवाणघेवाण झाल्याचा दाट संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. ‘वरकमाई’च्या बदल्यातच फरार आरोपीच्या केंद्राला अभय दिले जात असल्याची चर्चा आता दौंड तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे.

आपल्या कडक आणि पारदर्शक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आता जनतेचे डोळे लागले आहेत. केवळ भेसळ करणाऱ्या दूधमाफियांनाच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि लाच घेऊन डोळेझाक करणाऱ्या एफडीएच्या स्वतःच्या अधिकाऱ्यांचीही पारदर्शकता तपासा आणि त्यांची ‘कडक’ चौकशी करा, अशी आक्रमक मागणी आता पुणे जिल्ह्यातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवले जाणार की तुकाराम मुंढे स्वतः या प्रकरणात लक्ष घालून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
