नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. : 70281 92140

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोल प्लाझावरून संत शिरोमणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना पालखी सोहळ्यातील वारकरी, दिंड्या तसेच पालखी सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांकडून कोणत्याही प्रकारची टोल वसुली करण्यात येऊ नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने पाटस टोल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिनांक १३ जुलै रोजी पालखी सोहळा वरवंड येथे मुक्कामी असून १४ जुलै रोजी सकाळी पाटस येथील मंदिरात न्याहारी करून पाटस टोल प्लाझा मार्गे रोटी–बारामतीकडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर पाटस ग्रामस्थांच्या वतीने संभाजी ब्रिगेडने टोल प्रशासनाला वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी अनेक वारकरी स्वतःच्या चारचाकी वाहनांमधून प्रवास करतात. या वाहनांमधून दिंड्यांसाठी लागणारा जेवणाचा शिधा, मंडपाचे साहित्य, औषधे, वैद्यकीय साहित्य तसेच वृद्ध, महिला, दिव्यांग आणि अशक्त वारकऱ्यांची वाहतूक केली जाते. ही वाहने नफेखोर किंवा व्यावसायिक उद्देशाने नसून पालखी सेवेचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे या वाहनांकडून टोल आकारणे अन्यायकारक असून पालखी सोहळ्याच्या पावित्र्याला बाधा आणणारे आहे.

अविनाश मोहिते, महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे म्हणाले की, “दरवर्षी काही वारकरी आणि दिंडी चालकांकडून टोल वसुलीबाबत तक्रारी समोर येत असतात. काही वेळा दिंडीची वाहने टोल नाक्यावर थांबविली जातात किंवा टोल भरण्याबाबत वाद निर्माण झाल्याच्या तक्रारीही ऐकायला मिळतात. यामुळे वारकऱ्यांचा वेळ वाया जातो आणि धार्मिक सोहळ्यात अनावश्यक अडथळे निर्माण होतात. याबाबत टोल प्रशासनाने अत्यंत संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक आहे.”

यावेळी मोहिते यांनी केवळ टोलमाफीच नव्हे, तर वारकऱ्यांसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली. त्यांनी सांगितले की, पाटस टोल प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपत पालखी मार्गावर आणि टोल परिसरात पुढील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात—

– पालखी सेवेशी संबंधित सर्व वाहनांना टोलमुक्त प्रवेश.
– वारकऱ्यांसाठी स्वच्छ व पुरेशा संख्येने शौचालये आणि स्नानगृहांची व्यवस्था.
– पिण्याच्या स्वच्छ व थंड पाण्याची मोफत सुविधा.
– वृद्ध, महिला व दिव्यांग वारकऱ्यांसाठी विशेष मदत कक्ष.
– टोल परिसरात नियमित स्वच्छता व कचरा व्यवस्थापन.
– रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था.
– रात्रीच्या प्रवासासाठी पुरेशी विद्युत रोषणाई.
– आपत्कालीन वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार केंद्र.
– वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन व अतिरिक्त कर्मचारी नियुक्ती.

अविनाश मोहिते पुढे म्हणाले, “वारकरी हे महाराष्ट्राच्या संत परंपरेचे वाहक आहेत. त्यांची सेवा करणे हे प्रत्येक प्रशासनाचे नैतिक कर्तव्य आहे. टोल प्रशासनाने केवळ महसूल वसुली न पाहता सामाजिक उत्तरदायित्व जपत वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घ्यावा. पालखी सोहळ्यात सहभागी कोणत्याही वारकऱ्याला किंवा सेवावाहनाला मनस्ताप होणार नाही, याची संपूर्ण काळजी घ्यावी.”

संभाजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने पाटस ग्रामस्थांच्या सहकार्याने टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, वरील सर्व मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed