नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. :  70281 92140

दौंड : एकीकडे अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडल्याचा डंका पिटला जात असताना, दुसरीकडे दौंड तालुक्यात मात्र या मोहिमेचा पुरता बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ४ जून रोजी तालुक्यातील ‘भैरवनाथ दूध संकलन केंद्रावर’ धाड टाकून भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले होते. या कारवाई नंतरही काही दिवस उलटून गेले, तरीही हे केंद्र सील न करता राजरोसपणे सुरू ठेवण्यात आल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भेसळयुक्त दुधाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या माफियांच्या पाठीवर नक्की कोणाचा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल आता दौंडकर विचारू लागले आहेत.
  

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ‘भैरवनाथ दूध केंद्रा’चा मुख्य सूत्रधार बापूराव झगडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. एवढा मोठा गुन्हा घडूनही हे केंद्र सुरूच होते. मात्र, माध्यम प्रतिनिधींना याची कुणकुण लागताच, केंद्रचालक होले याने रात्रीच्या अंधारात एफडीएच्या महिला अधिकारी ‘बारवकर’ यांची भेट घेतली. पितळ उघडे पडेल या भीतीने सदर महिला अधिकाऱ्याने “वातावरण शांत होईपर्यंत केंद्र काही दिवस बंद ठेवा” असा अजब ‘तोंडी’ सल्ला केंद्रचालकाला दिल्याचा आरोप होत आहे.


  

जेथे केंद्र तात्काळ सील करून परवाना रद्द करायला हवा होता, तिथे फक्त ‘काही दिवस शांत राहण्याचा’ सल्ला देण्यामागे नक्की कोणते ‘अर्थकारण’ शिजले? ‘वरकमाई’च्या बदल्यातच फरार आरोपीच्या केंद्राला अभय दिले जात असल्याचा दाट संशय आता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
  

एफडीएने पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि जळगाव या जिल्ह्यांत केलेल्या कारवाईत दूध क्षेत्रातील अनेक बड्या धेंडांची नावे समोर आली आहेत. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेच्या अहवालातून भेसळीचे भयानक स्वरूप आणि त्यामागील मोठी आंतरजिल्हा साखळी उघड होण्याची शक्यता आहे. मात्र, दौंडमधील अधिकाऱ्यांच्या अशा संशयास्पद भूमिकेमुळे या संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  

आपल्या कडक, प्रामाणिक आणि पारदर्शक कार्यपद्धतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे एफडीएचे धडाडीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आता पुणे जिल्ह्यातील जनतेचे डोळे लागले आहेत. जनतेची मागणी आहे की, मुंढे साहेबांनी केवळ दूधमाफियांनाच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या, लाच घेऊन डोळेझाक करणाऱ्या एफडीएच्या स्वतःच्याच ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्यांचीही कडक चौकशी करावी आणि त्यांना तात्काळ निलंबित करावे!
  

आता तरी या दूध केंद्रावर अधिकृत कारवाई होऊन ते सील होणार की भ्रष्ट अधिकाऱ्यांची मेहरबानी अशीच सुरू राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed