माणगांव – उत्तम पां . तांबे  (  संपादक – रायगड जिल्हा  )

पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘शाश्वत कृषी विकास’ या धोरणांशी सुसंगत पाऊल उचलत ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे. कंपनीने आपल्या CSRउपक्रमांतर्गत माणगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींतील १,२०० हून अधिक शेतकऱ्यांना ४५ प्रजातींची १३,६९३ फळझाडे व औषधी वनस्पती मोफत वितरित केली आहेत.

या उपक्रमामागे पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचे शाश्वतपर्यायीसाधन उपलब्ध करून देणे हा दुहेरी उद्देश आहे. गेल्या चारवर्षांपासूनसातत्याने सुरू असलेल्या या लोककल्याणकारी उपक्रमातून आतापर्यंत ग्रामीण भागात ३५,००० पेक्षा अधिक फळझाडांचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत  शेतकऱ्यांना शोभेची झाडे न देता आर्थिक मूल्य असलेली नगदी फळझाडे देण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, फणस, पेरू, चिकू, जांभूळ, नारळ यांसारख्या झाडांचा समावेश असून येत्या काही वर्षांत ही झाडे वाढून शेतकऱ्यांसाठी नियमित व भक्कम उत्पन्नाचा स्रोत ठरतील. परिणामी, पारंपरिक शेतीवरचे अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फळझाडांसोबतच उपयुक्त व औषधी वनस्पतींचेही वाटप करण्यात आले आहे. यात हळद, तमालपत्र, काळीमिरी, पानवेल, रिठा, हिरडा, शतावरी अशा विविध वनस्पतींचा समावेश आहे. या वनस्पतींच्या माध्यमातून शेतकरी आंतरपीक घेऊन कमी जागेत अधिक नफा मिळवू शकतील.

या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात, कंपनीने येत्या ऑगस्ट महिन्यात आणखी २,५०० झाडांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

उपक्रमाबाबत बोलताना पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, “हवामान बदलाच्या काळात केवळ वृक्षारोपण पुरेसे नाही; लागवड झालेली झाडे लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि उपजीविकेचा भाग बनली पाहिजेत. शेतकऱ्यांना यातून हक्काचे उत्पन्न मिळवून देणे आणि गावांचा परिसर हिरवागार करणे हाच आमचा मुख्य हेतू आहे. शेतकरी बांधवांचा वाढता सहभाग आमचा उत्साह द्विगुणित करतो.”

ग्रामीण भागाला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवतानाच पर्यावरण संरक्षणाला चालना देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed