चांगदेव काळेल  ( सातारा जिल्हा संपादक )

जकातवाडी ग्रामपंचायतीतील कथित लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाने आता स्फोटक वळण घेतले असून, “माजी सरपंच मालामाल झाला आणि गाव मात्र कंगाल झाले” असा घणाघाती आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अजित उर्फ चांगदेव अरुण काळेल यांनी प्रशासनाविरोधात थेट रणशिंग फुंकले आहे. कथित भ्रष्टाचारातील दोषींवर १४ ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

सन २०१८ ते २०२१ या कालावधीत ग्रामपंचायत जकातवाडीमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारासंदर्भातील पुरावे, कागदपत्रे तसेच माहिती अधिकारातून प्राप्त झालेली माहिती संबंधित पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करूनही प्रशासनाने अद्याप दोषींना हात लावलेला नसल्याचा आरोप काळेल यांनी केला आहे.

कथित घोटाळ्याचे पुरावे प्रशासनाच्या टेबलावर पडून आहेत; मात्र कारवाईची फाईल पुढे सरकत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई होत नसल्याने नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

“भ्रष्टाचाराचे पुरावे दिले, तक्रारी केल्या, पाठपुरावा केला; पण प्रशासनाने कानाडोळा केला. दोषींना अभय आणि तक्रारदाराला न्यायासाठी संघर्ष अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा संतप्त सूर काळेल यांच्या निवेदनातून उमटला आहे.

गावाच्या विकासासाठी आलेला निधी कुठे खर्च झाला, विकासकामांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि काहींची आर्थिक भरभराट कशी झाली, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी, अन्यथा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आत्मदहन करून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली असून जकातवाडीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण आता जिल्हाभर चर्चेचा विषय बनले आहे. कारवाई होणार की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या फाईली धूळ खात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed