स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांमधून साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा धाराशिव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून पवनचक्कीचे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पवनचक्की चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अनसुरडी शिवारातील फॉरेस्ट परिसरात पवनचक्कीच्या पॉईंटवरून चोरी करणारी टोळी दाट झाडीत थांबलेली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फॉरेस्टच्या जवळ जाऊन वाहन थांबविले. त्यानंतर काही इसम पायी चालत येताना दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी झाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पवनचक्की चोरीच्या घटनांबाबत अधिक तपास सुरू केला.
चौकशीदरम्यान आरोपींनी खामकरवाडी येथील पवनचक्की प्रकल्पातून कॉपर केबल, कॉपर वायर, कॉपर रॉड आणि तार चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप जप्त करण्यात आली.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिल नाना काळे (वय ४०, रा. मस्ता), नंदू रामा शिंदे (वय ३२, रा. खामकरवाडी), बबलू उर्फ राम शिवाजी शिंदे (वय २९, रा. खामकरवाडी) आणि शाम उर्फ बाबा शंकर शिंदे (वय २८, रा. खामकरवाडी) यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींचा पवनचक्की चोरीच्या घटनांशी संबंध असल्याचे समोर आले असून, पवनचक्की चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इणजापवार, सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गाडेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, चापोहे/महेशबुव अरक, प्रकाश बोईनवाड आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे पवनचक्की प्रकल्पांमधील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासाचे कौतुक होत आहे.
