नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
केडगाव (ता. दौंड) : केडगाव गावच्या हद्दीत व्यंकटेश पेट्रोलियम पंपासमोर रविवारी (दि. 16 ऑगस्ट 2026) पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात फिर्यादीस किरकोळ दुखापत झाली असून वाहनांचेही नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालक आरोपी ओंकार अंतराम कणसे, रा. रेणापूर, जि. लातूर, हा वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविताना त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच 23 एयू 1817 क्रमांकाच्या कंटेनरला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात शेटीबा वडजी मुधोळकर (वय 70 वर्षे) आणि देवानंद सुरेश मुधोळकर (वय 17 वर्षे), दोघेही रा. 12 नंबर पाटी, मांजरा, ता. रेणापूर, जि. लातूर, यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी शेटीबा मुधोळकर हे फिर्यादी सचिन सुरेश मुधोळकर यांचे आजोबा, तर देवानंद हा त्यांचा लहान भाऊ असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
अपघातात सचिन सुरेश मुधोळकर (वय 25 वर्षे), व्यवसाय मजुरी, यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे रुग्णवाहिकेसह इतर वाहनांचे नुकसान झाल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणी सचिन सुरेश मुधोळकर यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 842/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 324(4), 281, 106(1), 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता दाखल करण्यात आला.
अपघात नेमका कशामुळे झाला, रुग्णवाहिकेचा वेग किती होता आणि चालकाच्या निष्काळजीपणाची नेमकी परिस्थिती काय होती, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वागज करीत आहेत.
