स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर : पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे उपस्थितीत पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अम्ब्रेला शेल्टरचे उद्घाटन.

               लातूर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व शिस्तबद्ध करण्यासोबतच वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या सुविधेकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. भर उन्हात तसेच पावसाळ्यात प्रतिकूल हवामानात रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांना संरक्षण मिळावे, यासाठी लातूर शहरातील एकूण ११ प्रमुख ठिकाणी अम्ब्रेला शेल्टर उभारण्यात आले आहेत.

                 आज दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लातूर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी उभारण्यात आलेल्या अम्ब्रेला शेल्टरचे उद्घाटन करण्यात आले.

                लातूर शहरातील वाढती वाहतूक, प्रमुख चौकांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि दिवसभर रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या वाहतूक पोलिसांचा विचार करून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

                  वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांना शहरातील विविध चौक, सिग्नल व प्रमुख मार्गांवर प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करावे लागते. उन्हाची तीव्रता, पाऊस तसेच बदलते हवामान यांचा सामना करत हे कर्मचारी सातत्याने आपले कर्तव्य बजावत असतात.
अशा परिस्थितीत अम्ब्रेला शेल्टरमुळे वाहतूक पोलिसांना उन्हापासून व पावसापासून आवश्यक संरक्षण मिळणार असून, प्रतिकूल हवामानातही वाहतूक नियंत्रणाचे काम अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

*११ ठिकाणी अम्ब्रेला शेल्टर*

                  लातूर शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या एकूण ११ ठिकाणी अम्ब्रेला शेल्टर बसविण्यात आले आहेत. या सुविधेमुळे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना केवळ हवामानापासून संरक्षण मिळणार नसून, त्यांच्या कामकाजासाठी अधिक सुरक्षित व सोयीचे वातावरण निर्माण होणार आहे.वाहतूक पोलिसांच्या आरोग्याची व कामाच्या परिस्थितीची काळजी घेतानाच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत, सुरक्षित व प्रभावी करण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
                   लातूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच, वाहतूक नियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या मूलभूत सुविधांकडेही लातूर पोलीस दलाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. ११ अम्ब्रेला शेल्टरच्या सुविधेमुळे ‘सुरक्षित वाहतूक’सोबतच ‘कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची सुरक्षितता’ यालाही प्राधान्य मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *