15 ऑगस्ट 2026
स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
लातूर : लातूर शहरातील बीएसएनएलच्या केबल वायर चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विवेकानंद चौक परिसरात मध्यरात्री धडक कारवाई करत १० संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत चोरी केलेल्या केबल वायरच्या विक्रीतून मिळालेली २ लाख १९ हजारांची रोख रक्कम तसेच चोरीच्या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली एक पिकअप व चार मोटारसायकली असा एकूण १४ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक लातूर शहरात मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी विवेकानंद चौक ते गंजगोलाई जाणाऱ्या रोडवरील यशवंत शाळेसमोरील वेअरहाऊस परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाजवळ संशयास्पदरीत्या काही व्यक्ती थांबले असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकास मिळाली.
पथकाने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी सापळा रचून पिकअप व चार मोटारसायकलींसह संशयित १० इसमांना ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता रामा व्यंकटी शिंदे व अनिल शामराव पवार यांच्या ताब्यात २,१९,०००/- रोख रक्कम आढळून आली.
पोलिसांनी आरोपींकडे मिळालेल्या रोख रकमेबाबत तसेच त्यांच्या वाहनांबाबत विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, काही दिवसापूर्वी यशवंत शाळेच्या परिसरातून परिसरातून बीएसएनएलची केबल वायर चोरी करून ती पिकअप वाहनातून नेल्याची तसेच चोरी केलेली केबल विक्री करून त्यातून मिळालेली रोख रक्कम आपल्याकडे असल्याची माहिती आरोपींनी दिली. एवढेच नव्हे तर पुन्हा केबल चोरी करण्याच्या उद्देशाने ते सर्वजण त्या ठिकाणी थांबले असल्याचेही तपासात समोर आले.
पोलिसांनी केलेल्या जप्ती कारवाईत आरोपींकडून २,१९,०००/- रोख रक्कम,महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप क्र. MH-24-AU-1948 वेगवेगळ्या कंपनीच्या चार मोटरसायकली असा एकूण १४,६९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत—
1. रामा व्यंकटी शिंदे, वय ५२ वर्षे, रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली.
2. अनिल शामराव पवार, वय ४० वर्षे, रा. पळसगाव, ता. वसमत, जि. हिंगोली.
3. अंकुश मनोहर शिंदे, वय २९ वर्षे, रा. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी.
4. शंकर प्रकाश शिंदे, वय २५ वर्षे, रा. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी.
5. विजय मारोजी शिंदे, वय ४५ वर्षे, रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली.
6. लक्ष्मण बापू शिंदे, वय ४५ वर्षे, रा. हिवरा भारली, ता. घनसावंगी, जि. जालना.
7. प्रकाश सावळा शिंदे, वय ३६ वर्षे, रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली.
8. सुनिल रमेश शिंदे, वय २४ वर्षे, रा. सुडावा, ता. पूर्णा, जि. परभणी.
9. शिवा पांडुरंग पवार, वय २१ वर्षे, रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली.
10. सुनिल रामा शिंदे, वय २२ वर्षे, रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली.
सदर कारवाईच्या अनुषंगाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल असून, आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे हजर करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, साहेबराव हाके, रसूल पठाण, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, रामलिंग शिंदे, सूर्यकांत कलमे, विनोद चलवाड, प्रशांत स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे,संतोष खांडेकर, मनोज खोसे, प्रेमदास राठोड, शैलेश सुडे यांनी केली आहे.
लातूर शहर व जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांकडून गुन्ह्यांचा समांतर तपास, गोपनीय माहितीचे संकलन आणि संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. बीएसएनएलसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधांशी संबंधित केबल चोरीमुळे दूरसंचार व्यवस्था तसेच नागरिकांच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा चोरीच्या घटनांकडे पोलिसांकडून अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. पुढील तपास विवेकानंद चौक चे पोलीस अंमलदार खुर्रम काझी व राठोड हे करीत आहेत.
