आदर्श भोसले  ( जेजुरी प्रतिनिधी )

पुरंदर जेजुरी : कोळविहिरे येथील घाटेमळा परिसरात अज्ञात चोरट्याने घराचे पत्र्याचे पान उचकटून घरात प्रवेश करत कपाटातील तब्बल ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सुमारे साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना सोमवार (दि. २४) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी महादेवी संतोष घाटे (वय ३५, व्यवसाय शेती, रा. कोळविहिरे, घाटेमळा, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३१(१), ३३१(३), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महादेवी घाटे या सोमवारी सकाळी घरातील काम आटोपून सासू-सासऱ्यांसह शेतात चवळी तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. सायंकाळी सुमारे ७ वाजता त्या घरी परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप उघडून घरात गेल्या असता घराचे पत्र्याचे पान उचकटलेले आणि हुक खाली पडलेला दिसून आला. त्यामुळे घरात चोरी झाल्याचा संशय त्यांना आला.

त्यानंतर कपाटातील लॉकर तपासले असता सोन्याचा गंठण, राणीहार, सोन्याची अंगठी, कानातील फुले-वेल आणि टॉप्स असे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत ४ लाख ८५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती पतीला दिल्यानंतर महादेवी घाटे यांनी सासऱ्यांसोबत जेजुरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्याने घराचे पत्र्याचे पान उचकटून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही स. फौजदार पिंगळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed