पंकज सरोदे ( महाराष्ट्र प्रतिनिधी )
मंचर (ता. आंबेगाव) : जिद्द, प्रचंड आत्मविश्वास आणि अफाट ज्ञानाच्या जोरावर पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तालुक्यातील लांडेवाडी गावची कन्या आणि सध्या मुंबईतील धारावी परिसरात वास्तव्यास असलेल्या कु. रुचिता आढळराव हिने सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय शोमध्ये ५० लाख रुपयांची घसघशीत रक्कम जिंकून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

हॉट सीटपर्यंतचा संघर्षमय प्रवास
धारावीसारख्या अत्यंत प्रतिकूल आणि दाटीवाटीच्या वातावरणात राहत असतानाही रुचिताने कधीही दारिद्र्याला आपल्या स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही. अभ्यासाची अफाट आवड आणि सतत नवीन शिकण्याच्या वृत्तीच्या बळावर तिने देशातील अत्यंत कठीण निवड प्रक्रियेतून जात ‘केबीसी’च्या हॉट सीटवर आपले स्थान पक्के केले.

शो दरम्यान अत्यंत शांतपणे आणि विचारपूर्वक कठीण प्रश्नांना सामोरे जात तिने ५० लाख रुपयांचा पल्ला गाठला.
“आई-वडिलांना घर आणि स्वतःसाठी एक बेड घेणार…”
खेळादरम्यान सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी जेव्हा विचारले, “रुचिता… क्या करोगी इन पैसों का?” तेव्हा तिने दिलेले उत्तर संपूर्ण देशवासियांचे डोळे पाणावणारे ठरले. रुचिता म्हणाली:
“या पैशांतून मी आई-वडिलांना एक चांगले घर घेऊन देणार आहे आणि आजपर्यंत मी कधीच बेडवर झोपलेली नाही, म्हणून स्वतःसाठी एक साधा बेड घेणार आहे.”

तिच्या या उत्तरातील साधेपणा आणि कुटुंबाप्रती असलेली कृतज्ञता पाहून महानायक अमिताभ बच्चनही भावूक झाले. रुचिताच्या संघर्षाला सलाम करत बिग बींनी तिच्यासाठी खास काव्यपंक्ती सादर केल्या:
“तुम हालातों की भट्टी में,
जब-जब भी मुझको झोकोगे,
तब-तब तप कर सोना बनूँगी मैं,
तुम कब तक मुझको रोकोगे…”
आंबेगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण
रुचिताच्या या यशामुळे लांडेवाडीसह संपूर्ण आंबेगाव तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात अभिमानाची लाट पसरली आहे. आर्थिक अडचणी कधीही यशाच्या आड येत नाहीत, हे तिने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. तिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.


