नेताजी खराडे (  क्राईम रिपोर्टर )

मो. नं. :  70281 92140

पाटस : येथील परिसरात सध्या उसाला मिळणाऱ्या तुटपुंज्या दरामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, गुरुवारी नागेश्वर आखाडा येथे आयोजित बैठकीत ‘पाटस ऊस उत्पादक कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. उसाला प्रति टन ४,५०० दर मिळावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली असून, योग्य दर मिळेपर्यंत संपूर्ण परिसरात ऊसतोड पूर्णपणे बंद ठेवण्याचा एकमुखी इशारा देण्यात आला आहे.
  

सध्या पाटस परिसरात उसाला अवघा ३,५०० ते ३,६०० प्रति टन दर मिळत आहे. लगतच्या राहू बेटात उसाला ४,७०० तर शिरूर तालुक्यात ४,३०० दर दिला जात असताना पाटसमध्ये मात्र शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पाटसच्या शेतकऱ्यांची ४,५०० ची मागणी अत्यंत रास्त असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.
  

साखरेचे दर ४५ वरून ७५ वर, तर गुळाचे दर ५० वरून ८० पर्यंत पोहोचले आहेत. तरीही गुऱ्हाळ मालक दर वाढवून देण्यास टाळाटाळ करत आहेत. बाजारपेठ स्थिर झाल्यावर निर्णय घेऊ, अशी भूमिका गुऱ्हाळ मालकांनी घेतली असली तरी, शेतकऱ्यांनी मालकांना दर निश्चित करण्यासाठी एक दिवस दिला आहे.


  

महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगलीनंतर दौंड तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल ७०० गुऱ्हाळे कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत ऊस दराची कोंडी न फुटल्याने तालुक्यातील वातावरण तापले आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवार (दि. २८) रोजी सकाळी १० वाजता नागेश्वर आखाडा येथे पुन्हा सर्व शेतकऱ्यांची व गुऱ्हाळ चालक, मालक यांची बैठक बोलावण्यात आली असून, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘पाटस ऊस उत्पादक कृती समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.
  

दौंड तालुक्यात गुऱ्हाळ मालक महाराष्ट्रीयन आणि चालक परप्रांतीय अशी परिस्थिती आहे. शेतकरी मालकाकडे बघून ऊस पुरवितात परंतु दर मात्र परप्रांतीय ठरवितात. महाराष्ट्रातील उसाचा दर ठरविण्याचा अधिकार परप्रांतीयांना कोणी दिला? असा सवाल येथील शेतकरी विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *