स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दिनांक २५/०८/२०२६
लातूर : मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १२ गुन्हे उघडकीस, २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त.

लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे१) तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर)

हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटारसायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे.

आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
