स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर : महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत तेरणा नदीपात्रातून अवैध उपसा करून शेतात साठवलेला वाळूसाठा ताब्यात.

                    जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत तब्बल १०० ब्रास, अंदाजे ५ लाख रुपये किमतीचा अवैध वाळूसाठा जप्त केला.

                 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला औराद शहाजनी परिसरातील तेरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून ती लगतच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला.

                       कारवाईदरम्यान तेरणा नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवल्याचे आढळून आले. सदर वाळूसाठ्याची महसूल विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून सविस्तर पंचनामा केला आणि १०० ब्रास वाळूसाठा जप्त केला.सदर वाळूसाठा कोणी व कोणत्या उद्देशाने अवैधरीत्या उपसा करून साठवून ठेवला होता, याबाबत महसूल विभागाकडून पुढील चौकशी व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

                 ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संजय कांबळे, रामलिंग शिंदे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे तसेच महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर व तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) शुभम वाघमारे, औराद शहाजनी यांच्या संयुक्त पथकाने केली.

                लातूर जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस व महसूल विभागाकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येत असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *