नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
दौंड : ( केडगाव ) दौंड तालुक्यातील केडगाव येथील ऐतिहासिक मुक्ती मिशन चर्चने सेवा, प्रार्थना आणि विश्वासाचा १२७ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला. या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती मिशन प्रशासनाच्या वतीने विशेष प्रार्थना सभा, आराधना (Prayer Service) आणि सेवाभावी कार्याला समर्पित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्त्रियांचा उद्धार, तसेच अनाथ, वंचित आणि पीडित महिलांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पंडिता रमाबाई यांनी १८८९ मध्ये मुंबई येथे शारदा सदनची स्थापना केली. त्यानंतर १८९७ मध्ये केडगाव येथे मुक्ती मिशनची पायाभरणी झाली. मिशनमधील प्रार्थना मंदिर अर्थात चर्चचे बांधकाम १८९९ च्या सुमारास पूर्ण झाले आणि तेव्हापासून हे चर्च सेवा, प्रार्थना आणि विश्वासाचा संदेश देत आजही खंबीरपणे उभे आहे.
यावेळी मिशनच्या व्यवस्थापनाच्या सल्लागार श्रीमती लॉरेन फ्रान्सिस, मिशन संचालक श्री अनिल फ्रान्सिस, व्यवस्थापन मंडळी, मिशनचे कर्मचारी तसेच स्थानिक ख्रिस्ती समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पास्टर प्रकाश साळवे आणि के. प्रसाद यांनी केले.

याप्रसंगी मुक्ती मिशन प्रशासनाने भावना व्यक्त करत सांगितले की, “पंडिता रमाबाईंनी लावलेले सेवेचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. हे चर्च केवळ प्रार्थनेचे ठिकाण नसून प्रेम, करुणा आणि मानवतेचे प्रतीक आहे. १२७ वर्षांचा हा प्रवास आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”
या ऐतिहासिक चर्चमध्ये आजवर अनेकांच्या प्रार्थनांना उत्तर मिळाले असून शेकडो लोक आशीर्वादित झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मागील १२७ वर्षांपासून सेवा आणि विश्वासाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या ख्रिस्ती मंदिराची पुढील वाटचालही अशीच सेवाभावी, प्रार्थनामय आणि आशीर्वादित राहावी, अशी प्रार्थना उपस्थितांनी केली.
