स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखांवरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण १,८५,००० रुपये किमतीच्या ४ चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
कारवाईचा सविस्तर तपशील:
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या आदेशावरून २४ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मोरे व त्यांचे पथक धाराशिव जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांच्या शोधासाठी पेट्रोलिंग करत होते.

पेट्रोलिंग दरम्यान पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून एका संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले. विचारपूस केली असता त्याने आपले नाव परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे (वय ४० वर्षे, रा. जुना बस डेपो जवळ, पारधी पिढी, धाराशिव) असे सांगितले.
सुरवातीला त्याने चोरीच्या गाड्यांबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरलेल्या मोटार सायकली लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने नमूद ठिकाणी धाड टाकून ४ मोटार सायकली हस्तगत केल्या.
वेगवेगळ्या ठाण्यांतून केल्या होत्या चोऱ्या:
जिल्हा गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता, या जप्त केलेल्या मोटार सायकली पोलीस ठाणे आनंदनगर, धाराशिव ग्रामीण, पोस्टे औसा (जि. लातूर) आणि पोस्टे कर्जत (जि. अहिल्यानगर) यांच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जापवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस अंमलदार समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शोभा बांगर, प्रकाश, चापोका दहिहांडे आणि शेरखाने यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
