पंकज सरोदे ( महाराष्ट्र प्रतिनिधी )
पुणे / अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डाची सून, पुण्याची जिगरबाज कन्या आणि MBCPR Regd.च्या लेणी संवर्धिका आद. वैशाली भीमराव शेलार यांनी रशियातील जगप्रसिद्ध माऊंट एल्ब्रुस शिखराचे यशस्वी शिखरारोहण करून महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दि. १५ ऑगस्ट रोजी माऊंट एल्ब्रुसच्या शिखरावर तिरंगा फडकवण्याचे स्वप्न वैशाली शेलार यांनी मनाशी बाळगले होते. शिखरावर तिरंगा फडकवून देशाला अभिवादन करण्याचे त्यांचे ध्येय होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे नियोजित दिवशी शिखरारोहण पूर्ण करता आले नाही. परिस्थितीमुळे स्वप्न पुढे ढकलले गेले; मात्र त्यांची जिद्द आणि निर्धार कायम राहिला.

नियोजित प्रयत्न अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी हार न मानता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी माऊंट एल्ब्रुसचे शिखर यशस्वीरीत्या सर केले आणि शिखरावर तिरंगा फडकवत आपल्या स्वप्नाची पूर्तता केली.
माऊंट एल्ब्रुसची उंची सुमारे ५,६४२ मीटर (१८,५१० फूट) असून, अत्यंत थंड हवामान, बर्फाच्छादित व आव्हानात्मक पर्वतीय मार्ग, विरळ ऑक्सिजन आणि प्रतिकूल हवामान अशा अनेक आव्हानांचा सामना करत वैशाली शेलार यांनी हे यश संपादन केले.
“१५ ऑगस्टचे स्वप्न २१ ऑगस्टला साकार झाले; तारीख बदलली, पण ध्येय, जिद्द आणि स्वप्न बदलले नाही,” हे त्यांच्या शिखरविजयातून अधोरेखित झाले आहे.

लेणी संवर्धनापासून हिमशिखरांपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
आद. वैशाली भीमराव शेलार यांचा लेणी संवर्धनापासून हिमशिखरांपर्यंतचा प्रवास विशेष प्रेरणादायी आहे. त्या MBCPR – Motivation of Buddhist Caves Preservation and Restoration Foundation (Regd.) च्या लेणी संवर्धिका म्हणून प्राचीन बौद्ध लेणी, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक ठेव्याच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत.

इतिहास आणि वारसा जपण्याच्या कार्यासोबतच गिर्यारोहणाच्या माध्यमातून त्यांनी साहस, धैर्य, आत्मविश्वास आणि जिद्दीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील मुली आणि महिलांसमोर एक नवे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डाची सून, पुण्याची जिगरबाज कन्या आणि MBCPR ची लेणी संवर्धिका म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या वैशाली शेलार यांनी माऊंट एल्ब्रुसच्या शिखरावर तिरंगा फडकवत महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा गौरव वाढविला आहे.

त्यांच्या या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद शिखरविजयाबद्दल MBCPR तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी आणि नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
संपर्क
आद. वैशाली भीमराव शेलार
वय : ४५ वर्षे
मो. : ८२६३८००६९५
प्रज्वल भीमराव शेलार (मुलगा)
मो. : ७०८३४९३५५२
पत्ता : सर्व्हे नं. १०३, गांधी नगर, येरवडा, पुणे – ६.
