स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
लातूर : कासारशिरशी चोरीची म्हैस केली हस्तगत नळदुर्ग पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांतील चोरीचे जनावरेही हस्तगत.
कासारशिर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्याची म्हैस चोरी करून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कासारशिर्शी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली म्हैस हस्तगत करण्यात आली असून, त्याच्याकडून नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावर चोरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली जनावरेही हस्तगत करण्यात आली आहे.
दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजेच्या सुमारास नदी हत्तरगा येथील शेतात बांधलेली प्रेमनाथ माधव घोडके यांची अंदाजे १ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची म्हैस चोरीस गेली होती. सकाळी म्हैस दिसून न आल्याने फिर्यादीने तिचा परिसरात तसेच जनावरांच्या बाजारात शोध घेतला.
दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू करून संबंधित आरोपीचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान चोरीस गेलेल्या म्हशीचा फोटो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फिर्यादीस मिळाल्यानंतर फिर्यादी व पोलिसांनी संबंधित शेतात जाऊन पाहणी केली. तेथे दोन म्हशी आढळून आल्या. त्यापैकी एक म्हैस ही त्याचीचअसल्याचे फिर्यादीने ओळखले. सदर ठिकाणी म्हशी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव
१)सुनील उर्फ मल्लीनाथ नागनाथ काटे, रा. नांदगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव असे सांगितले.
पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी म्हशी तेथेच सोडून पळून गेला पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.या प्रकरणी कासारशिर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २०३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा करण्यात आला असून पुढील तपासात सदर आरोपीचा नळदुर्ग पोलीस ठाणे, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील गुन्हा क्र. ३९२/२०२५, ४६२/२०२५ व ४६१/२०२५ या जनावर चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध असल्याचे समोर आले असून, सदर गुन्ह्यांतील चोरीस गेलेली जनावरेही हस्तगत करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासारशिर्शी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच तपासी अंमलदार हेड कॉन्स्टेबल किशोर मोहन तपसे यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
