स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
नांदेड : नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. या पथकाने लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात लागोपाठ छापे टाकून मटका आणि प्रतिबंधित गुटखा विक्री विरोधात मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १३ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून ५ लाख ४६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१. लातुरात मटका बुकींवर छापा (११ आरोपी ताब्यात):
दिनांक १९ ऑगस्ट रोजी विशेष पथकाने लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन मटका अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून:
रोख रक्कम: ₹५२,७७०/-
९ मोबाईल: किंमत ₹१,०७,०००/-
२ टॅबलेट: किंमत ₹३०,०००/-
संगणक साहित्य: किंमत ₹२,१३,५००/-
एकूण ४,०३,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गु.र.नं. ५८५/२०२६ आणि ५८६/२०२६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२. हिंगोलीत प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त:
दिनांक २० ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे अनखळी गावात ही कारवाई करण्यात आली. येथील माणिक यशवंतराव गारकर याच्या घरात साठवून ठेवलेला १ लाख ४२ हजार ७८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी माणिक यशवंतराव गारकर व संजय बाळासाहेब गारकर (दोघे रा. अनखळी, ता. औंढा, जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कामगिरी करणारे पथक व कौतुक:
ही यशस्वी कामगिरी पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन ढवरे यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांचे विशेष कौतुक केले.
‘खबर’ हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन:
परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांची माहिती थेट वरिष्ठ पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष ‘खबर’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
हेल्पलाईन क्रमांक: 91 50 100 100
नागरिकांनी आपल्या परिसरातील मटका, जुगार, अवैध दारू, गुटखा अशा अवैध धंद्यांची माहिती या क्रमांकावर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
