स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
लातूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसारित; पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे अवघ्या चार तासांत आई-वडिलांची मुलीशी भेट.
देवणी येथील आठवडी बाजारात आईपासून दुरावल्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत हरवलेल्या अवघ्या चार वर्षीय मुलीला देवणी पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेऊन सुखरूप तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले.
दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास देवणी येथील आठवडी बाजार परिसरात आरोही ही चार वर्षीय मुलगी पोलिसांना हरवलेल्या अवस्थेत आढळून आली. आईपासून दुरावल्यामुळे ती अत्यंत घाबरलेली होती. तसेच तिला व्यवस्थित बोलता येत नसल्याने तिच्या पालकांची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते.

देवणी पोलिसांनी तत्काळ मुलीची काळजी घेत तिच्या पालकांचा शोध सुरू केला. मुलीची ओळख पटविण्यासाठी तिची माहिती व छायाचित्र सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून प्रसारित करण्यात आले. दरम्यान, मुलीचे वडील अजय चव्हाण हे अशिक्षित असून त्यांच्याकडे मोबाईल फोन नसतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली. यानंतर सायंकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास अजय चव्हाण हे देवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आवश्यक पडताळणी करून सदर मुलगी त्यांचीच असल्याची खात्री झाल्यानंतर आरोहीला सुखरूप तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर मुलगी पालकांच्या स्वाधीन झाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
देवणी पोलिसांच्या संवेदनशील व तत्पर कार्यवाहीबद्दल मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी देवणी पोलीस पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या संवेदनशील कार्याचे कौतुक केले.
*पालकांनी विशेष काळजी घ्यावी.*
लातूर पोलीस दलाकडून सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की, गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे व त्यांना एकटे सोडू नये. मुल हरवल्यास विलंब न करता डायल ११२, चाइल्ड हेल्पलाइन १०९८ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा.
