स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

अहमदपूर : लातूर पोलीस दलाच्या वतीने, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ या उपक्रमाला अहमदपूर येथे मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शंकर-पार्वती मंगल कार्यालय, निजवंते नगर, थोडगा रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष प्रबोधनपर मेळाव्यास परिसरातील विविध शाळांमधील तब्बल ६ हजार विद्यार्थी उपस्थित होते.

                   कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी केले. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे, नगराध्यक्ष अॅड. स्वप्निल व्हते, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचे धर्मपाल गायकवाड, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, प्रा. अनिल चवळे आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

                ‘आई-बापाचा श्वास निघून गेल्यावर भिंतीवरील फोटोतील आई-बाप जीव लावायला येणार नाहीत’

                   ‘न समजलेले आई-बाप… समजून घेताना’ या विषयावर डॉ. वसंत हंकारे यांनी केलेले हृदयस्पर्शी मार्गदर्शन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव करून देताना त्यांनी विद्यार्थ्यांना भावनिक साद घातली.

“आई-बापाचा श्वास निघून गेल्यावर भिंतीवरील फोटोतील आई-बाप जीव लावायला येणार नाहीत. मुला-मुलींच्या आयुष्यातील खरे देवी-देवता म्हणजे आई-बाप,” या आशयातून त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले.

भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील होऊन लाखो रुपये कमावले, मात्र ते यश पाहण्यासाठी आई-वडीलच नसतील, तर त्या संपत्तीचा उपयोग काय, असा भावनिक प्रश्न उपस्थित करत त्यांनी विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. आई-वडिलांची मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य करू नका, त्यांच्या कष्टांचे चीज करा आणि आपल्या चांगल्या वर्तनातून त्यांचे नाव उज्ज्वल करा, असा संदेश त्यांनी दिला.

लहानपणी प्रेमळ वाटणारे आई-वडील मोठे झाल्यानंतर बंधने घालतात, असा गैरसमज अनेक विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतो. हा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे सांगताना डॉ. हंकारे यांनी विद्यार्थ्यांना पालकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.

              डॉ. हंकारे यांच्या भावनिक आणि हृदयस्पर्शी व्याख्यानाने संपूर्ण सभागृहातील वातावरण भारावून गेले. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर काही विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. उपस्थित पालकही भावूक झाले. व्याख्यानाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त दाद दिली.

*व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षेचा संदेश.*

                  पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि नैतिक शिक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे, ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहणे, सायबर गुन्ह्यांची माहिती करून घेणे आणि व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले.

               महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच कायद्याचे पालन करून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर चांगले संस्कार, कायद्याचे भान आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हेच ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

                या मेळाव्यास महात्मा गांधी कॉलेज, महात्मा फुले विद्यालय, यशवंत विद्यालय, कमला नेहरू विद्यालय, नूतन विद्यालय, अहिल्या होळकर विद्यालय, संत ज्ञानेश्वर विद्यालय, टागोर विद्यालय, किलबिल नॅशनल स्कूल, पोद्दार इंग्लिश स्कूल, मॉडेल इंग्लिश स्कूल, विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल, समर्थ इंग्लिश स्कूल, लोकराजा माध्यमिक विद्यालय आदी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

               कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोविंद काळे, महेंद्र खंडागळे, गोविंद शेळके, अश्विन आंधळे, ज्ञानोबा भोसले, प्रतिक रेड्डी, रामलिंग तत्तापूरे, मोहीब कादरी व प्रा. द. मा. माने यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कपिल बिरादार यांनी केले, तर आभार प्रा. अनिल चवळे यांनी मानले.

               पालकांप्रती प्रेम, कायद्याबाबत जागरूकता, व्यसनमुक्त जीवनशैली, सायबर सुरक्षेचे भान आणि उज्ज्वल भवितव्याची दिशा देणारा ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ मेळावा अहमदपूरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed