अजित काळेल ( सातारा जि.संपादक  )

सांगली  : ( कवठेमहांकाळ ) सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात कवठेमहांकाळ तालुक्याचा एक वेगळाच दरारा आहे. याच मातीत अनेक नररत्ने घडली, पण ऊसतोड कामगाराच्या झोपडीतून झेप घेत जनसामान्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय केराप्पा विठोबा लोखंडे. हातामध्ये ऊस तोडण्याचा कोयता आणि डोक्यावर गरिबीच्या संकटांची मोळी असतानाही, परिस्थितीचे चटके सोसत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, तो प्रवास आजही अनेकांना प्रेरणा देणारा असाच आहे. शिक्षणाची कोणतीही पदवी गाठीशी नसताना, जीवनाच्या शाळेत अनुभवाचं सर्वात मोठं अर्थशास्त्र शिकलेला हा ‘शिंदेवाडीचा वाघ’ खऱ्या अर्थाने लोकनियुक्त लोकनेता ठरला. केराप्या मामांचे बालपण संघर्षाच्या भट्टीत भाजून निघाले. कष्टकरी बापाचा हा स्वाभिमानी मुलगा जेव्हा ऊसतोड टोळीचे आर्थिक व्यवहार लिलया सांभाळू लागला, तेव्हाच त्यांच्यातील संघटक आणि नेतृत्वगुणांची ठिणगी पडली होती.

  नियतीशी दोन हात करत असतानाच त्यांचा संबंध राजकारणातील दिग्गजांशी आला. माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू आणि माजी खासदार स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांसारख्या जननायकांच्या मार्गदर्शनाखाली मामांच्या कर्तृत्वाचा वटवृक्ष बहरला. नानासाहेब सगरे, विजय अण्णा सगरे आणि चंद्रकांत हाक्के बापू यांसारख्या नेत्यांच्या गळ्यातील ताईत असणारे लोखंडे मामा दिसायला जेवढे करारी होते, तेवढेच अंतकरणाने कोमल होते. मामांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करायचे झाले तर तो शिंदेवाडीच्या गावपांढरीचा एक चालता-बोलता इतिहास होता. उंचपुरा देह, धिप्पाड शरीरयष्टी, डोक्यावर पांढरीशुभ्रस्वाभिमानी गांधी टोपी, अंगात

पांढरा सदरा आणि खाली स्वच्छ धोतर…
हा त्यांचा पेहराव म्हणजे एका रुबाबदार परंपरेचे जिवंत दर्शन होते. जेव्हा मामा आपल्या धीरगंभीर आवाजात साद घालत, तेव्हा ऐकणाऱ्याला आदरासोबतच एक विलक्षण दरारा जाणवत असे. राजकारणी मंडळी त्यांना आदराने ‘मामा’ म्हणत, तर शिंदेवाडीची जनता त्यांना प्रेमाने ‘आण्णा’ हाक मारत असे.

ही दोन नावे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील विश्वास आणि प्रेमाची दोन भक्कम नाती होती. शिंदेवाडीचे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून जेव्हा त्यांनी गावची धुरा हाती घेतली, तेव्हा खऱ्या अर्थाने विकासाची गंगा घराघरात पोहोचली. सलग १५ वर्षे सरपंच पदावर राहून त्यांनी गावाचा कायापालट केला. मात्र, मामांचे मोठेपण केवळ सिमेंटच्या रस्त्यात किंवा इमारतींत नव्हते, तर ते लोकांच्या सुख-दुःखात रात्री-अपरात्री धावून जाण्याच्या वृत्तीत होते. “शब्द दिला की तो पाळायचा हा त्यांच्या आयुष्याचा मूळ मंत्र होता.

दिलेला शब्द फिरवणे त्यांच्या रक्तातच नव्हते, म्हणूनच संपूर्ण तालुक्यात ‘एकवचनी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असे. गरिबांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मामांचे नावच पुरेसे होते. भरल्या पंचायतीत जेव्हा ते न्यायनिवाडा करत, तेव्हा समोरचा कितीही बलाढ्य असला तरी तो मामांच्या न्यायी भूमिकेसमोर नतमस्तक व्हायचा.

ऊसतोड कामगाराचा मुलगा ते गावचा ‘अनभिषिक्त सम्राट’ असा हा प्रवास थक्क करणारा आहे. ज्या हातांनी एकेकाळी उदरनिर्वाहासाठी कोयता धरला, त्याच हातांनी शिंदेवाडीच्या विकासाचे तोरण बांधले. केराप्पा मामा लोखंडे हे केवळ एक नाव नसून तो एक विचार आहे, एक अथांग माणुसकीचे प्रतीक आहे, आजही मामांचा दरारा तेवढाच आहे, एकच शब्द येतो -“माणूस असावा तर असा, शब्दाचा पक्का आणि जनसेवेचा  सच्चावाघ!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *