अजित काळेल ( सातारा जि.संपादक )
भुईंज पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईल शोध मोहिमेत भुईंज पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल ९ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ४३ मोबाईल हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

भुईंज व पाचवड या मुख्य बाजारपेठांमध्ये परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असल्याने प्रवासादरम्यान तसेच बाजारपेठेत मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या आदेशानुसार विशेष मोहिम राबविण्यात आली.
अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी विशेष पथक स्थापन केले. या पथकाने सीईआयआर पोर्टलसह तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोबाईल वापरणाऱ्या धारकांशी संपर्क साधत शोधमोहीम राबवली.

या मोहिमेत एक आयफोन-१६ प्रो मॅक्ससह विविध कंपन्यांचे एकूण ४३ स्मार्टफोन हस्तगत करण्यात आले. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात ६.७० लाख रुपये किमतीचे ३० मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले होते.
यापुढेही गहाळ मोबाईल शोध मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरेश शिंदे, तसेच सपोफौ टकले, पोलीस हवालदार नितीन जाधव, अप्पा कोलवडकर, पोलीस नाईक धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार, बल्लाळ, मोहिते, निंबाळकर यांनी सहभाग घेतला.
