नेताजी खराडे (क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
करमाळा : टेंभुर्णी ते जेऊर रस्त्यावर गांजाची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करणाऱ्या एका तरुणाला करमाळा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी २,५२,५०० रुपये किमतीचा १० किलो १०० ग्रॅम गांजा आणि ८,००,००० रुपये किमतीची पजेरो स्पोर्ट कार असा एकूण १०,५२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी रात्री पावणेनऊ ते १० वाजेच्या सुमारास मौजे पांगरे (ता. करमाळा) हद्दीतील टेंभुर्णी ते जेऊर जाणारे रस्त्यावरील पांगरे स्मशानभूमीजवळ एक इसम पजेरो कारमध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना मिळाली. माहितीची खात्री करून पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी सापळा रचला.

संशयित ठिकाणी अंधारात थांबलेल्या पजेरो कारला घेराव घालून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव रोहित शिवाजी केचे (वय २४, रा. गारअकोले, ता. माढा, जि. सोलापूर) असे सांगितले.
कारची व आरोपीची पंचांसमक्ष झडती घेतली असता, कारमध्ये (क्र. एमएच-१२-केएफ-१८९९), ५ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला १० किलो १०० ग्रॅम वजनाचा ओला व उग्र वासाचा गांजा आढळून आला. अंदाजे २५ हजार रुपये प्रति किलो दराचा हा गांजा आणि कार असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पो.कॉ. गणेश लालासाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोहित केचे याच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८ (क), २० (ब)(२)(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, स.पो.नि. दिलीप ढेरे, पो.उप.नि. संदीप बनकर, पो.हे.कॉ. दुष्यंत ढेंबरे, पो.हे.कॉ. लोहार, पो.हे.कॉ. अलिम मलिक शेख, पो.कॉ. अर्जुन गोसावी, पो.कॉ. गणेश शिंदे, पो.कॉ. रमेश फुगे, पो.कॉ. चेतन पवार व चा.पो.कॉ. ज्योतीराम बारकुंड यांच्या पथकाने केली आहे.
