शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी )

इंदापूर : चेतना फाउंडेशन अंतर्गत चेतना इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेज तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “UDAAN – Wings of Culture” वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व बौद्धिक गुणवत्तेचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण मंगलमय झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  श्री. विलास नाळे (पोलीस निरीक्षक, इंदापूर ग्रामीण) यांची विशेष उपस्थिती लाभली. संस्थेचे सर्वश्री अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव  विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे तसेच सर्व व्यवस्थापन पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाषण प्रा. प्रांजली सुतार यांनी केले. त्यांनी “UDAAN – Wings of Culture” या संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश स्पष्ट केला.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा, सांस्कृतिक व बौद्धिक क्षेत्रातही प्रगती करण्याचे महत्त्व सांगितले.

प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत शिस्त, आत्मविश्वास व सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, समूह नृत्य, नाटिका, देशभक्तीपर सादरीकरणे व विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांचा तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्विझ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. गीतांजली कांबळे व डॉ. निलेश सोनवणे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता झगडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे शेवटी प्रा. पायल निकम यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed