नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
मो.नं. :- 7028192140
पाटस: प्रशासनाचा वचक संपला की गुंडांचे राज्य सुरू होते, याचाच प्रत्यय सध्या पाटस (ता. दौंड) येथे येत आहे. हॉटेल व्यावसायिक अमोल तांदळे यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना आणि वृत्तवाहिनीच्या संपादकांना थेट धमक्या देण्यापर्यंत अतिक्रमणधारकांची मजल गेली आहे. तलावाच्या सरकारी जागेवर डल्ला मारणाऱ्या या ‘पांढरपेशी’ गुंडांनी आता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच हल्ला चढवला आहे.

अमोल तांदळे या स्थानिक हॉटेल व्यावसायिकावर गेल्या काही काळापासून अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात आणि तलावाच्या जमिनीवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात काही धाडसी पत्रकारांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. आपली काळी कृत्ये उघड होतील या भीतीने बिथरलेल्या अतिक्रमणधारकांनी आता थेट पत्रकारांना दमदाटी करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे, तर वृत्तवाहिनीच्या मुख्य कार्यालयात फोन करून संपादकांवर “बातम्या थांबवा, नाहीतर गाठ आमच्याशी आहे” अशा भाषेत दबाव टाकण्यात आला आहे.

तलावाची जागा ही सार्वजनिक मालमत्ता आहे. तिथे अतिक्रमण होत असताना तहसीलदार आणि प्रांत कार्यालय गप्प का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. तलावाची मोजणी करण्यास टाळाटाळ का केली जात आहे?मोजणी करून अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला कोणाच्या ‘मुहूर्ता’ची प्रतीक्षा आहे? गुंडांच्या धमक्यांकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करून एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?
पत्रकारांना धमकावणे म्हणजे संपूर्ण समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. पाटसमध्ये कायद्याचे राज्य आहे की या गुंडांचे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जोपर्यंत तांदळे यांना न्याय मिळत नाही आणि तलावावरील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त होत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा पवित्रा स्थानिक संघटनांनी घेतला आहे.
“जर प्रशासनाने तातडीने मोजणी करून अतिक्रमण हटवले नाही आणि पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल!”….सामाजिक संघटना.
