अजित काळेल  ( सातारा जिल्हा संपादक )

सातारा : वाई तालुक्यातील भुईंज, कुडाळ, बावधन परिसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर डल्ला मारून जनावरे चोरणाऱ्या पिकअप गँगला भुईंज पोलिसांनी जेरबंद केले. बेंदूर सणाच्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कवठे (ता. वाई) येथील शेतकरी किरण नानासो पोळ यांच्या गोठ्यातून दोन म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या गोठ्यातून जनावरे लंपास करणाऱ्या टोळीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भुईंज पोलिसांना तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विशेष पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आरोपी पिकअप वाहनातून वाईहून पाचवडकडे येत असल्याची माहिती मिळताच पाचवड चौकात पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी कवठे येथील दोन म्हशी, ओझर्डे येथील एक म्हैस, खडकी येथील एक जर्सी गाय तसेच कुडाळ येथील दोन म्हशी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेली जनावरे चाकण (जि. पुणे), काष्टी-श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील गुरांच्या बाजारात विक्री केल्याचेही उघड झाले आहे.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. चोरीस गेलेली जनावरे परत मिळवण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अटक आरोपी :
१) सुरेश ऊर्फ सूर्यकांत आनंदराव चव्हाण (वय ३५, रा. पाचवड, ता. वाई)
२) संदेश हणमंत पिसाळ (वय २७, रा. व्याजवाडी, ता. वाई)
३) हर्षद हिंदुराव चव्हाण (वय १८, रा. कडेगाव, ता. वाई)
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तसेच भुईंज पोलीस ठाण्यातील पोहवा नितीन जाधव,  पोहवा धायगुडे, पोकॉ सोमनाथ बल्लाळ,  पोकॉ सागर मोहिते,  पोकॉ किरण निंबाळकर यांनी महत्वाची भूमिका बजावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed