नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )

मो.   : 7028192140

दौंड  : दौंड तालुक्यात खळबळ
२५ वर्षांपासूनच्या व्यवसायावर डल्ला मारण्याचा प्रयत्न; यवत पोलिसांत तक्रार, आता कारवाईकडे सर्वांचे लक्ष!

पाटस (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुंडगिरीने डोके वर काढले असून, आता कष्टकरी व्यावसायिकांना भरदिवसा धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पाटस (ता. दौंड) येथील एका हॉटेल व्यावसायिकाला ‘हॉटेल रिकामे कर, नाहीतर जेसीबीने उखडून टाकू’ अशी थेट धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही इसमांनी केला आहे. या प्रकरणाने दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, अमोल विक्रम तांदळे हे मागील २५ वर्षांपासून पाटस येथील नागनाथ तलावाजवळ आपला हॉटेलचा व्यवसाय प्रामाणिकपणे चालवत आहेत. या हॉटेलवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही स्थानिक व्यक्तींच्या नजरा या जागेवर पडल्या असून, त्यांनी तांदळे यांना व्यवसाय बंद करण्यासाठी धमकावण्यास सुरुवात केली आहे.
    तक्रारीनुसार, वसंत निवृत्ती पानसरे, सुनील धनंजय पवार, साहील वसंत पानसरे, विजय निवृत्ती पानसरे आणि त्यांच्या साथीदारांनी तांदळे यांना हॉटेलसमोर गाठून “हे हॉटेल चालवायचे नाही, अन्यथा जेसीबी आणून हॉटेल उखडून टाकू,” अशी धमकी दिली. इतकेच नाही तर, विरोध केल्यास मारहाण करण्याची आणि पोलिसांत खोटे गुन्हे दाखल करण्याची भीतीही घातली आहे. गावातील काही मुलांना हाताशी धरून वारंवार निरोप पाठवून तांदळे यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
    विशेष म्हणजे, संबंधित हॉटेलची वीज जोडणी (लाईट बिल) आणि पाणीपट्टी ही तांडळे यांच्या नावावर असून ते सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत आहेत. तरीही केवळ दादागिरीच्या जोरावर त्यांचा हक्काचा व्यवसाय हिरावून घेण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात आहे. “आमच्या रोजीरोटीवर गदा येत असून माझ्या जीवाला धोका आहे,” अशी हतबलता तांदळे यांनी व्यक्त केली आहे.
    या गंभीर प्रकाराबाबत तांदळे यांनी यवत पोलीस स्टेशनसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. आता पोलीस या गुंडगिरीला आळा घालणार की राजकीय दबावापुढे झुकणार, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. एका २५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या माणसाला जर अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? असा तिखट सवाल आता उपस्थित होत आहे.

“मी २५ वर्षांपासून कष्टाने व्यवसाय करत आहे. सर्व कागदपत्रे माझ्या नावावर आहेत. तरीही केवळ जागेच्या हव्यासापोटी मला आणि माझ्या कुटुंबाला धमकावले जात आहे. पोलिसांनी मला न्याय द्यावा आणि संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करावी.”
— अमोल विक्रम तांदळे (तक्रारदार).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed