स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दि.22 / 08 / 2026
लातूर : शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील २०२१ सालच्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस; आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत तीन वर्षांपासून चोरीची मोटारसायकल वापरणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, सदर मोटारसायकल शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ४५८/२०२१, कलम ३७९ भादवि या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष पथकाचे पोलीस अंमलदार आरोपींचा शोध घेत असताना बसस्थानक परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जुना रेणापूर नाका परिसरात एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला आहे. माहितीची खात्री करून विशेष पथकाने वाहतूक नियमनासाठी कर्तव्यावर असलेले सफौ बाळासाहेब गिते यांना सोबत घेत जुना रेणापूर नाका येथील मनपा सुलभ शौचालयासमोर दुपारी १२.०५ वाजता सापळा रचला. यावेळी मोटारसायकलसह मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रमोद उर्फ काका प्रभाकर शिंदे (वय २६ वर्षे, रा. गांजूर, ता. चाकूर, जि. लातूर) असे सांगितले.
विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मोटारसायकलवर चुकीचा नंबर टाकून मागील सुमारे तीन वर्षांपासून स्वतःच्या गावात वापरत असल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे अभिलेख तपासले असता सदर मोटारसायकल ही शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील गु.र.नं. ४५८/२०२१, कलम ३७९ भादवि या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीकडून हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदर मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर चुकीचा क्रमांक लावण्यात आल्याचेही आढळून आले.
आरोपी प्रमोद उर्फ काका प्रभाकर शिंदे यास ताब्यात घेऊन संबंधित चोरीच्या गुन्ह्यात पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय माधवराव शिंदे यांनी पथकासह केली. जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
