नेताजी खराडे क्राईम रिपोर्टर

मो.न. :  70281 92140

पाटस : मौजे कानगाव (ता. दौंड) येथील गट क्रमांक ७९१/हिस्सा न. ५ च्या जमीन मालक पार्वती महादेव अडसूळ यांच्या शेतात जाण्या-येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तहसीलदार अरुण शेलार (दौंड) यांच्या आदेशानुसार, सर्वे नंबरच्या व प्रत्येक गटधारकाच्या बांधापासून १० फूट रुंदीचा शेत रस्ता गुरुवारी (३० जुलै) यशस्वीरीत्या मोकळा करून देण्यात आला.
  

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या शेत रस्त्याच्या सुनावणीनंतर दौंडच्या तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारी करण्यात आली. या कारवाई अंतर्गत गट क्रमांक ७९१/१, २, ३, ४ आणि गट क्रमांक ७९२/१, २ या सर्व गटांच्या बांधापासून १० फुटी रस्ता काढण्यात आला आहे.
  

हा रस्ता खुला करण्याची कारवाई तहसीलदार अरुण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष घटनास्थळी पाटसच्या मंडल अधिकारी संगीता खराडे आणि ग्राम महसूल अधिकारी श्रीमती सय्यद यांनी चोख नियंत्रण ठेवले. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
  

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शामराव अडसूळ यांच्यासह इतर संबंधित खातेदारांच्या शेतातील सर्वे नंबरच्या बांधावरून हा रस्ता काढण्यात आला. सर्व खातेदार व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे रस्ता खुला करताना कोणत्याही प्रकारचा वाद किंवा अडचण निर्माण झाली नाही.
  

अनेक दिवसांपासून अडकून पडलेला रस्ता अखेर मोकळा झाल्याने पार्वती अडसूळ यांच्यासह संबंधित शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून महसूल व पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *