संदीप रोमन : ( पुरंदर ता. प्रतिनिधी )

पुरंदर निरा : पुरंदर तालुक्यातील निरा गावच्या हद्दीत बजाज शोरूमच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन ‘चक्री’ नावाच्या जुगारावर जेजुरी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी जुगार खेळविताना अरुण बाळू चव्हाण (वय ४३, रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रकमेसह ऑनलाइन जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १५ हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निरा गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये ही कारवाई करण्यात आली. पत्र्याच्या शेडमध्ये अरुण चव्हाण हा नागरिकांकडून पैसे स्वीकारून ‘चक्री’ नावाचा ऑनलाइन जुगार खेळत व खेळवत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

कारवाई दरम्यान पोलिसांनी ८ हजार रुपये किमतीचा मॉनिटर, ५ हजार रुपयांचे सीपीयू मशीन, ५०० रुपयांचा माऊस व किबोर्ड, ५ रुपयांचा बॉलपेन, २०० रुपयांचा १ ते १० रंगीत अंक असलेला फ्लेक्स बॅनर तसेच १ हजार ७०० रुपये रोख रक्कम, असा एकूण १५ हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद अप्पासाहेब कोळेकर यांनी फिर्याद दिली असून, आरोपी अरुण बाळू चव्हाण याच्याविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार ५७८ मदने करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार २३२३ पखाले यांनी केली. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed