नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )
मो.नं. : 70281 92140
दौंड तालुक्यातील यवत परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धायगुडेवाडी हद्दीत पुणे-सोलापूर महामार्ग वर 31 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11.15 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचारी गुरुनाथ गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून सापळा रचला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका संशयित पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी बलेनो कारची तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल 29.600 किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सुमारे 14 लाख 50 हजार रुपये असून, वाहनासह एकूण जप्तीची किंमत 20 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी शाकीर शब्बीर पानसरे आणि समाधान शिवाजी दाभाडे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने असून, पोलीस हवालदार सोनवणे यांनी गुन्हा नोंदवला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
