नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )
मो.नं. : 70281 92140
पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील टोलनाका परिसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही टोल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. तात्काळ दुरुस्ती करा जे अधिकारी कामचुकारपणा करत आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा अशी मागणी करणारे निवेदन प्रवीण कांबळे
टोल प्लाजा मॅनेजर पाटस यांना देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले पाटस बायपास रोड व मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर आवश्यक ते सुरक्षा चिन्हे, पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग यांचा पूर्ण अभाव आहे. तसेच टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना टोल माफी दिली जात नाही व कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते. पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत.

मेंटेनन्स कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व बोगस बिलांचा संशय व्यक्त करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाटस ग्रामस्थांच्या वतीने वारंवार तक्रार करून सुद्धा कारवाई होत नाही. तसेच दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
“स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे टोल प्रशासन तात्काळ शहाणे झाले नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” तसेच चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा
अविनाश अरविंद मोहिते, महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे यांनी दिला.
यावेळी पाटस ग्रामपंचायत माजी सदस्य शंकर पवार, शिवाजीराजे साळुंखे, मिथुन चव्हाण, इमरान खान सोनू पवार,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
